
सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘साडे माडे तीन’, ‘इरादा पक्का’ हे सिद्धार्थचे सिनेमे प्रचंड गाजले. याच सिनेमांच्या पंगतीत बसलेला आणखी एक सुपरहिट सिनेमा म्हणजे २०१० साली प्रदर्शित झालेला ‘हुप्पा हुय्या’. या सिनेमात सिद्धार्थने मुख्य भूमिका साकारली होती. आता या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरसंक्रांती निमित्त सिद्धार्थने ही ‘हुप्पा हुय्या २’ची घोषणा करत चाहत्यांची संक्रांत गोड केली आहे.
तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकरसंक्रातीनिमित्त सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावरुन ‘हुप्पा हुय्या २’चं पोस्टर शेअर केलं आहे. “जय हनुमान..जय बजरंगा..’हुप्पा हुय्या २’ लवकरच…”,असं त्याने म्हटलं आहे.