“कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही” – मुख्यमंत्री फडणवीस यांचं जनतेला आवाहन

0
132

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या टोरेस आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत चर्चा रंगली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला सावध राहण्याचे आवाहन करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. अधिक व्याजाचे आमिष म्हणजे धोका आहे.”

विधानसभेत झालेल्या चर्चेत आर्थिक फसवणुकीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “लोकांना आकर्षक परतावा देणाऱ्या योजनांचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहा. अशा कंपन्यांविरोधात पोलीस विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली असून, विविध माध्यमांतून जाहिरातीही देण्यात आल्या आहेत.”

 

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “अनेक कंपन्या कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणी करून सुरू होतात. त्यांना पोलिसांची परवानगी घेण्याची गरज नसते. त्यामुळे सुरुवातीला कारवाई करता येत नाही. पण अशा कंपन्यांकडून अधिक नफा देणाऱ्या जाहिराती आल्या, तर आर्थिक गुप्तचर शाखेद्वारे कारवाई केली जाते.”

 

“या कंपन्या सुरुवातीला काही महिने व्याज देतात आणि लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर अचानक गायब होतात. त्यामुळे जनतेने काळजीपूर्वक व्यवहार करावा, कोणत्याही योजनेवर विश्वास ठेवण्याआधी तपासणी करावी,” असे आवाहन करत फडणवीस म्हणाले, “कोणत्याही कंपनीकडे आवश्यक परवानग्या आहेत का, त्यांचा व्यवसाय काय आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. कुणीही खिशातून पैसे देत नाही!”

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पोलिसांकडून लवकरच अधिक व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत. नागरिकांनी फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतर्क राहणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here