
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : महाराष्ट्रात वाहनांवरील करावर आजपासून मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार १ जुलै २०२५ पासून नवीन वाहन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे महागड्या वाहनांसोबतच सीएनजी, एलएनजीसह मालवाहू वाहनांच्या किंमती वाढणार आहेत.
या नव्या कर सुधारणेमध्ये सर्व खासगी सीएनजी/एलपीजी वाहनांसाठी वन टाईम करात १% वाढ करण्यात येणार आहे. तसेच मोटार वाहन (एमव्ही) कराची कमाल मर्यादा २० लाख रुपयांवरून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच आता २० लाख रुपयांवरील वाहनांना जास्त कर द्यावा लागणार आहे. यामुळे वाहनांची ऑनरोड किंमत वाढली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला २०२५-२६ साठी सुमारे १७० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणार आहे.
समजा एखाद्याने महाराष्ट्रात १० लाख रुपयांची सीएनजी कार घेतली तर त्याला आधी ७० हजार रुपये करापोटी द्यावे लागत होते. ते आता ८०००० रुपए द्यावे लागणार आहेत. तसेच जर २० लाखांची सीएनजी कार घेतली तर १.४ लाख रुपयांऐवजी १.६ लाख रुपये कर द्यावा लागणार आहे. महाराष्ट्रात सीएनजी वाहनांना मोठी मागणी आहे.
तसेच पेट्रोल, डिझेल कारसाठी किंमतीनुसार कर भरावा लागणार आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पेट्रोल कारवर ११% कर आकारला जाईल. १० ते २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर १२% कर आणि २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर १३% कर भरावा लागेल. तर, डिझेल कारवर अनुक्रमे १३%, १४% आणि १५% कर आकारला जाईल. तसेच मालवाहू वाहनांसाठी यापूर्वी त्यांच्या वजनावर कर आकारला जात होता, ते आता बदलून किंमतीच्या ७ टक्के एवढा आकारला जाणार आहे.