
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयसीसी वनडेतील टॉप ८ संघ या स्पर्धेत सहभागी असून भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात येणार आहेत. भारतीय संघानं पाकिस्तानमध्ये जाऊन स्पर्धा खेळण्यास नकार दिल्यामुळे हायब्रिड मॉडेलनुसार, टीम इंडियासाठी एक वेगळा मार्ग काढण्यात आला आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नसली तरी कॅप्टन रोहित शर्मा पाकिस्तान दौरा करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामने १९ फेब्रुवारी ते ९ मार्च, २०२५ या कालावधीत पाकिस्तान आणि दुबईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघाचे सर्व सामने दुबईच्या मैदानात नियोजित आहेत. पण संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याला टीमशिवाय पाकिस्तान दौरा करावा लागणार असल्याचे समोर येत आहे. यामागचं कारण काय? टीम इंडियानं पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला असताना रोहित शर्मा एकटा तिकडे कशाला जाणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो.
बीसीसीआयनं स्पर्धेसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात येणार नाही ही भूमिका घेतल्यावर संघाचे सर्व सामने दुबईत घेण्यात आले. आता फोटोशूटसाठी बीसीसीआय टीम इंडियाच्या कॅप्टनला पाकिस्तानात पाठवण्यास राजी होणार का? हा नवा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीत बीसीसीआयने टीम प्रमाणेच कॅप्टनला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला तर सर्व कर्णधारांना फोटोशूटसाठी दुबईत येण्याची वेळ येऊ शकते. यासंदर्भात अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.