KKR विजयानंतर शाहरुखला मिठी मारत सुहाना, आर्यन आणि अबराम भावूक; बापलेकीचा व्हिडीओ व्हायरल

0
2

शाहरुख खान, जुही चावला यांच्या ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाने इंडियन प्रीमियल लीगच्या (आयपीएल) ट्रॉफीवर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. कोलकाताने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबाद टीमवर आठ गडी आणि 57 चेंडू राखून विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सने दुसऱ्यांदा चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर ‘आयपीएल’ची ट्रॉफी उंचावली. याआधी 2012 मध्ये कोलकाता संघाने आपलं पहिलं जेतेपद याच मैदानावर मिळवलं होतं. या विजयानंतर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. सोशल मीडियावर सध्या खान कुटुंबीयांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अंतिम सामना केकेआर टीम जिंकताच शाहरुख मैदानाच्या दिशेने धावला आणि टीममधल्या प्रत्येक खेळाडूला त्याने विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. विजयानंतरचा आनंद शाहरुखच्या चेहऱ्यावर स्पष्ट पहायला मिळत होता. केकेआर टीम, मार्गदर्शक, कुटुंबी यांच्यासोबत त्याने यश साजरा करण्याचा एकही क्षण सोडला नाही. केकेआरच्या विजयात महत्त्वाची भूमिका असलेल्या गौतम गंभीरला कौतुकाने किस करून शाहरुखने आनंद व्यक्त केला.

या सर्वांत आणखी एका व्हिडीओ नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. केकेआरची टीम जिंकल्यानंतर शाहरुखने त्याची पत्नी गौरी खानला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर किस केलं. त्यानंतर सुहाना खान तिच्या वडिलांकडे गेली. वडिलांना शुभेच्छा देत तिने मिठी मारली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात आनंदाश्रू सहज पहायला मिळत होते. सुहानाला मिठी मारून आनंद व्यक्त करत असतानाच शाहरुखचा छोटा मुलगा अबराम त्यांच्या दिशेने धावून आला. त्यानेसुद्धा वडिलांना मिठी मारली आणि त्याच्या मागून आर्यन खानसुद्धा वडिलांच्या दिशेने आला.

या व्हिडीओमध्ये सुहाना शाहरुखला विचारते की, “तुम्ही खुश आहात का?” त्यावर शाहरुख तिला म्हणतो, “मी खूप खुश आहे.” शाहरुखच्या कुटुंबीयांचे हे खास क्षण कॅमेरात टिपण्यात आले. गेल्या आठवड्यात शाहरुखला उष्माघाताच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर तो अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होता. यावेळी त्याची पत्नी गौरी, मुलं सुहाना, आर्यन आणि अबराम, मॅनेजर पूजा ददलानी, सुहाना खानच्या मैत्रीणी अनन्या पांडे आणि शनाया कपूरसुद्धा उपस्थित होत्या.

पहा व्हिडीओ:

instagram.com/reel/C7cOLC-IfiC

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here