३.५ लाखांची लॉटरी जिंकली, तरीपण का केली या व्यक्तीने आत्महत्या?कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

0
468

लॉटरी जिंकणे हे प्रत्येक लॉटरी विकत घेण्याऱ्याचे स्वप्न असते. लॉटरी जिंकल्यानंतर आपली स्वप्न किंवा महत्त्वाची कामं करण्याचा प्रयत्न केला जातो. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय चहाविक्रेत्याला ३.५ लाखांची लॉटरी लागली. मात्र काही दिवसांनी त्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने आत्महत्या का केली? याबाबत स्थानिक चर्चा करत आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आता या घटनेतील सत्य समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?
चहाविक्रेत्याने ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर साडे तीन लाखांची लॉटरी जिंकली होती. यावेळी १.६ लाख रुपये टीडीएसच्या स्वरुपात कापण्यात आले होते. ही रक्कम परत मिळवून देण्याच्या बहाण्याने काही लोकांनी चहाविक्रेत्याशी संपर्क साधला. रिफंड मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन आरोपींनी चहाविक्रेत्याकडून त्याचे दस्तऐवज घेतले. मात्र नंतर त्याचा पैशांसाठी छळ सुरू केला. हा छळ सहन न झाल्याने अखेर चहा विक्रेत्याने स्वतःचे जीवन संपविले.

अमेठीचे पोलीस अधीक्षक अनूप सिंह यांनी सांगितले की, चहाविक्रेता राकेश यादवने आत्महत्या केल्यानंतर त्याची आई शांती देवी यांनी एफआयआर दाखल केला. यामध्ये त्यांनी अनुराग जयस्वाल, तूफान सिंह, विशाल सिंह आणि हंसराज मौर्य यांच्यावर आरोप केले. या आरोपींनी राकेश यादवला बदनामी करण्याची भीती दाखविली, तसेच त्याचा वेळोवेळी छळ केला. राकेशकडून त्यांनी एक लाखांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर त्याचे कागदपत्र वापरून कर्ज काढू आणि तुला कर्जात बुडवून टाकू, अशी धमकी आरोपींनी दिली होती.

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. चौकशीत जे समोर येईल, त्यानुसार कारवाई करू. राकेश यादवने ऑनलाईन गेमिंग लॉटरीत ३.५५ लाख रुपये जिंकले होते. मात्र १.६ लाख रुपये टीडीएसच्या स्वरुपात कापण्यात आले होते.

राकेश यादव अविवाहित होता. पाच वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तर काही महिन्यापूर्वी त्याच्या भावाचाही मृत्यू झाला होता. यानंतर तो एकटा त्याच्या घरातील कमावता व्यक्ती होता. मात्र स्थानिक लोकांनी त्याचा मानसिक छळ केल्यानंतर तो नैराश्यात गेला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here