
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य एकत्रिकरणावर मोठा राजकीय वाद उफाळला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. “दोन्ही पवार एकत्र येऊ नयेत म्हणून राष्ट्रवादीतीलच दोन बडे नेते अडथळा ठरत आहेत,” असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला.
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी स्पष्टपणे नाव घेत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली. “हेच दोन नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रिकरणाच्या मार्गात मोठा अडथळा ठरत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
राऊत म्हणाले, “शरद पवार यांच्या विचारांवर आमचा पक्ष उभा आहे, असं म्हणणारे हेच लोक एकत्र येण्याच्या वेळी मागे हटतात. कारण त्यांना त्यांच्या ‘छोट्या दुकानांचं’ आणि पदांचं जास्त कौतुक आहे. प्रफुल्ल पटेल कोणतेही महान नेते नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. तटकरे अध्यक्ष असल्याने जर गट एकत्र आला, तर अध्यक्षपदावर प्रश्न निर्माण होतो. मंत्रिपदांचे गणितही बिघडते. म्हणूनच एकत्र येणं घडत नाही.” याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी काल केलेल्या एका टीकेची पुनरावृत्ती करत “तहान लागली तरी गटारीचं पाणी कुणी पीत नाही,” अशा शब्दांत भाजपसोबत जाणाऱ्यांवर निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांचे नाव घेण्यात येते, पण पवित्र उद्दिष्टासाठी गढूळ राजकारणाची गरज नाही, असंही त्यांनी सूचित केलं.
राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांवरही राऊतांनी सवाल उपस्थित केला. “हे घटनात्मक पद आहे. राजकीय सोय म्हणून आपल्याच जवळच्या व्यक्तींना या पदावर नेमणे म्हणजे महिलांच्या न्यायाच्या लढ्याला बाधा निर्माण करणे आहे. आयोगात नॉन पॉलिटिकल व्यक्ती असाव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, “शरद पवार हे फक्त नेते नाहीत, ते एक संस्था आहेत. फडणवीस किंवा शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं तरी त्यामुळे त्यांची उंची वाढत नाही. ते आधीच सह्याद्रीसारखे उंच आहेत,” अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या राजकीय कर्तृत्वाचं वर्णन केलं.