
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर असून, त्यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात खासदार, आमदार आणि पक्षाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पाटणा येथील बिहार भाजप कार्यालयात सुमारे 70 मिनिटे चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नेत्यांशी संवाद साधला आणि आगामी निवडणुकीसाठी विजयाचा मंत्र दिला.
आगामी निवडणुकीत एका बाजुला काँग्रेस-आरजेडी+ आघाडी आहे, तर दुसऱ्या बाजुला भाजप-जेडीयू+ आहे. अशा परिस्थितीत कोणाला कुठून तिकीट द्यायचे, हे पक्षासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत पीएम मोदींनी घराणेशाही व्यवस्थेचा उल्लेख केला. तसेच, पक्षातील नेत्यांना तिकीट मिळवण्यासाठी एक महत्त्वाची अट ठेवली आहे.
पंतप्रधान मोदींनी गुरुवारी भाजप कार्यालयात पक्ष नेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुका आणि संघटनेबाबत भाजप नेत्यांना अनेक सल्ले दिले. पंतप्रधान म्हणाले की, आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. हे चार पिढ्यांनंतर घडले आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या पूर्वजांचे बलिदान लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज येथे आहोत.
मोदी पुढे म्हणतात, पक्षातील सर्वात मोठे भांडवल म्हणजे संयम. जर तुम्ही धीर धरला तर तुम्हाला आदर मिळेल. निवडणुका आल्या की, काहीजण दुसऱ्या पक्षात जातात आणि नंतर परत पक्षात येतात, यामुळे तुमचे महत्त्व कमी होते. राजकारणात घराणेशाही नसावी. जमीनदारी नसावी. तुम्ही नाही, तर तुमचा मुलगा, ही व्यवस्था असू नये. एखादा साधा कार्यकर्ता कठोर परिश्रम का करतो, त्याला त्याच्या कष्टाचे फळ का मिळू नये?
पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना बूथ मजबूत करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी आपल्या नेत्यांसमोर एक अटही ठेवली. ते म्हणाले की, सोशल मीडियावर सक्रिय असले पाहिजे. ज्याला निवडणूक लढवायची आहे, त्याचे सोशल मीडियावर किमान 50 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असावेत. खालच्या पातळीवरील लोकांना सरकारच्या सकारात्मक कामाबद्दल सांगा आणि त्यांना जागरूक करा, असेही त्यांनी सांगितले.