
शेअर बाजारातील १.८१ कोटींच्या तोट्याने मुख्याध्यापकाचे टोकाचे पाऊल; पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन स्वतःही संपवले जीवन
बार्शी | प्रतिनिधी
शेअर बाजारात झालेल्या तब्बल १ कोटी ८१ लाख रुपयांच्या आर्थिक तोट्यामुळे एका सुशिक्षित कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे उघडकीस आली आहे. मुख्याध्यापक योगेश बाळासाहेब पाटील (वय ३९) यांनी पत्नी व दोन अल्पवयीन मुलांना विष देऊन त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेत योगेश पाटील यांच्यासह पत्नी माधुरी योगेश पाटील (वय ३७), मोठा मुलगा अथर्व (वय ११) आणि लहान मुलगा शिवांश (वय ९) यांचा मृत्यू झाला आहे. एका रात्रीत संपूर्ण कुटुंब संपुष्टात आल्याने बार्शी तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आईस्क्रीममधून विष दिल्याचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री योगेश पाटील यांनी पत्नी व दोन्ही मुलांना आईस्क्रीममधून विषारी पदार्थ दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. तिघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी स्वतः घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
घरातून सुसाईड नोटसह महत्त्वाचे पुरावे जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट, लॅपटॉप, दोन मोबाईल, विषारी औषधाची बाटली, दोरी आणि वॉलेट असा महत्त्वाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी सखोल तपासणी करून नमुने संकलित केले आहेत.
पत्नी व दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी मृत योगेश पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
शेअर बाजारातील कोट्यवधींच्या तोट्याने मानसिक तणाव
तपासादरम्यान योगेश पाटील यांना शेअर बाजारात सुमारे १ कोटी ८१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या आर्थिक धक्क्यामुळे ते दीर्घकाळ मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती मिळाली आहे. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नंदुरबार जिल्ह्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत
मूळचे हत्तीज (ता. बार्शी) येथील असलेले योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव (ता. तळोदा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. उन्हाळी सुट्टीनिमित्त ते कुटुंबासह मूळ गावी आले होते.
त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. कुटुंबात आईच त्यांचा प्रमुख आधार होती. दोन सावत्र बहिणी असलेल्या योगेश यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आईने लाखो रुपयांची मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
आईची धीर देण्याची धडपड अपुरी ठरली
योगेश यांनी मित्र व नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात उसने पैसे घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांची मानसिक अवस्था बिघडत असल्याची जाणीव त्यांच्या आईला झाली होती. त्यामुळे त्यांनी वारंवार धीर देत कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे समजावले होते. मात्र, अखेर त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही.
एकाच वेळी चार मृत्यूंनी परिसर शोकसागरात
घटनेची माहिती मिळताच योगेश पाटील यांच्या आईने घटनास्थळी हंबरडा फोडला. सुनेसह दोन नातवंडे आणि मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिक, नातेवाईक आणि महिलांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती.
धोंडेदान कार्यक्रमानंतर अवघ्या चार दिवसांत दुर्दैव
योगेश पाटील यांचे सासर मोहोळ तालुक्यातील देगाव येथे आहे. अधिक मासानिमित्त ८ जून रोजी झालेल्या धोंडेदान कार्यक्रमाला ते पत्नी व मुलांसह उपस्थित होते. त्यानंतर पुण्यातील एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहून ते हत्तीज येथे परतले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांत ही दुर्दैवी घटना घडल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.


