राज्याचे नवे मुख्य सचिव कोण? ; “या” तीन नावांची जोरदार चर्चा

0
189

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या यंदाच्या जूनअखेर सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे संपूर्ण मंत्रालयाचे लक्ष लागले आहे. संभाव्य नव्या मुख्य सचिव म्हणून आयएएस राजेशकुमार, आय. एस. चहल आणि भूषण गगराणी यांची नावे आघाडीवर असून, प्रशासनात वर्तुळात त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

सौनिक यांनी ३० जून २०२४ रोजी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव लाभल्या. आता त्या नियत वयोमर्यादेनुसार ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीसाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत.

 

सेवाज्येष्ठता महत्त्वाची की मुख्यमंत्री ठरवणार वेगळा निकष?
राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्री सेवाज्येष्ठतेच्या निकषांना डावलू शकतात, असे उदाहरण मुंबई पोलीस आयुक्त निवडीवेळी दिसून आले होते. त्यामुळे मुख्य सचिवपदासाठीसुद्धा मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे वरिष्ठ अधिकारी रिंगणात

राजेशकुमार: महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असून १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा सेवावधी ऑगस्ट २०२५पर्यंत आहे. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.

आय. एस. चहल: सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले चहल हे १९८९ बॅचचे अधिकारी असून त्यांची सेवानिवृत्ती जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनात कोविड काळात केलेल्या कार्यामुळे त्यांची प्रशंसा झाली होती.

भूषण गगराणी: १९९० बॅचचे अधिकारी असून सध्या ते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सेवावधी मार्च २०२६पर्यंत आहे. राज्य शासनात विविध महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.

 

निवडीकडे लक्ष लागले
या तिघांव्यतिरिक्तही काही नावांची अंतर्गत स्तरावर चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र, यापैकीच एकजण राज्याच्या प्रशासनाची सूत्रे पुढील काळात हाती घेणार, हे निश्चित आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here