“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही” – संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

0
55
xr:d:DAGBJXOo-XE:2,j:3944450852079375657,t:24040106

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही,” अशा शब्दांत राऊतांनी भाजपावर हल्ला चढवला आहे.

 

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “शिवसेना ही संपवण्यासाठी निर्माण झालेली नाही. अनेक वेळा प्रयत्न झाले, अनेकांनी शिवसेना सोडली, परतले, तरी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आजही उभी आहे. अमित शहा यांच्यासह अनेकांनी शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते फसले. बाळासाहेबांची शिवसेना जमिनीवर नेण्याची भाषा करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.”

 

गिरीश महाजनांवर गंभीर आरोप
भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला. “गिरीश महाजन हे भाजपने नेमलेले पहिल्या क्रमांकाचे दलाल आहेत. पक्ष फोडण्याचे काम त्यांच्याकडे दिले गेले आहे. परंतु ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल, त्या दिवशी भाजप सोडून पळणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू झाली होती, त्यावेळी त्यांनी पक्ष बदलण्याची तयारी दर्शवली होती,” असा गंभीर दावा राऊतांनी केला.

 

सुनील प्रभू, भारताची जागतिक प्रतिमा आणि राजकीय चर्चा
सुनील प्रभू आमच्याच पक्षाचे आमदार आहेत, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, “दोन्ही ठाकरे गट एकत्र येणार का, यावर चर्चा सुरू आहे, मात्र योग्य वेळीच त्याची माहिती दिली जाईल.”

 

पाहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या जागतिक प्रतिमेबाबतही राऊतांनी चिंता व्यक्त केली. “आज भारताची अवस्था जगात बिकट झाली आहे. या हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणताही देश उभा राहिला नाही. भारताला सध्या एकही खरी मैत्रीपूर्ण भूमिका घेणारा देश नाही,” असा दावा त्यांनी केला. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here