
माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोल्हापूर : शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे पूल दरम्यान सुमारे ३.५५ किमी लांबीच्या पिलरवर आधारित उड्डाणपुलासाठी सुमारे ९८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण झाला आहे. एल. एन. मलविया कंपनीने तयार केलेला हा अहवाल येत्या १० जून रोजी केंद्र सरकारला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सादर केला जाणार आहे.
या उड्डाणपुलामुळे पावसाळ्यात होणाऱ्या पूरस्थितीतसुद्धा पुणे-बंगळुरू महामार्ग सतत वाहतुकीसाठी खुला राहणार असून, २०१९ व २०२१ साली महामार्ग बंद होण्याची वेळ आलेली होती, ती पुन्हा ओढवणार नाही.
पूरग्रस्त जनतेचा आवाज आणि राजकीय पाठबळ
महापुरामुळे महामार्ग बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त समितीने आंदोलन करत उड्डाणपुलाची मागणी केली होती. त्यानंतर जिल्ह्याचे मंत्री, आमदार व खासदारांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन पिलरवर उड्डाणपुलासाठी आग्रह धरला होता. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नवीन प्रस्ताव मागवला होता आणि २३ डिसेंबर २०२३ रोजी गोवा येथील बैठकीत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिला होता.
असा असेल उड्डाणपुलाचा आराखडा :
उड्डाणपुलाची एकूण लांबी: ३५५० मीटर
त्यातील पिलरवरचा मुख्य पूल: २४७५ मीटर
उचगाव रेल्वे पूलानंतरचा रस्ता: १०४५ मीटर
शिरोली फाट्यानंतरचा रस्ता: ३० मीटर
रस्त्याची रुंदी: ३० मीटर
सेवामार्ग लांबी: ५८२६ मीटर
मुख्य रॅम्प व जोड रस्ते:
सांगलीहून महामार्गाकडे:
रॅम्प: २७० मीटर, मर्जिंग: १२० मीटर
गांधीनगरहून महामार्गावर:
रॅम्प: १७१ मीटर
कोल्हापूरहून महामार्गाकडे:
रस्ता: ५९० मीटर
महामार्गावरून कोल्हापूरकडे:
रस्ता: १३४५ मीटर
सर्व रस्त्यांची रुंदी: ८.५ मीटर
पुढील टप्पा – केंद्राकडे मान्यता, टेंडर प्रक्रिया
हा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे सादर होताच, त्याची तातडीने मंजुरी मिळवून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नवा ठेकेदार नेमून प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांकडून समजते.
कोल्हापूरवासीयांना दिलासा
या उड्डाणपुलामुळे कोल्हापूर, सांगली, कागल परिसरातील नागरिकांना पूरस्थितीतही सुरक्षित व अखंड वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प महापुराविरहित आणि दीर्घकालीन उपाययोजना ठरणार असून, कोल्हापूरच्या विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.