
माणदेश एक्सप्रेस/पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात गोलंदाज हर्षित राणाची बरीच चर्चा रंगली. त्याने इंग्लंडचे ३ विकेट्स घेत टीम इंडियाला सामना जिंकून देण्यात मोठी कामगिरी बजावली. हर्षित राणा या सामन्याचा भाग नव्हता. त्याला सामन्याच्या मध्यंतराच्या वेळी शिवम दुबेचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले आणि त्यानंतर त्याने ही कामगिरी केली. पण हर्षितच्या समावेशावरून अनेक प्रश्न निर्माण झाले. दुबेच्या बाबतीत जे झालं त्याला कन्कशनचा नियम लागू होईल का असे प्रश्न विचारण्यात आले.
भारत-इंग्लंड सामन्यातील भारताच्या डावाच्या शेवटच्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनचा चेंडू फलंदाज शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला. चेंडू हेल्मेटला लागताच टीम इंडियाचे फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी दुबेची तपासणी केली. दुबे तंदुरुस्त आहे की नाही आणि पुढे खेळू शकतो का हे त्याने पाहिले. डावात फक्त २ चेंडू बाकी होते त्यामुळे दुबे खेळत राहिला. पण जेव्हा टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण सुरू झाले, तेव्हा दुबेच्या जागी हर्षित राणा पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात आला आणि त्यानंतर बीसीसीआयने अपडेट दिली की हर्षित हा कन्कशन-सब म्हणून संघात घेतला आहे.
एखाद्या खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागून दुखापत झाली किंवा कोणत्याही प्रकारे धक्का बसला, याला कन्कशन म्हणतात. याचा थेट परिणाम मेंदूवर, डोक्यावर, चेहऱ्यावर किंवा मानेभोवतीच्या भागावरही होऊ शकतो. म्हणजेच, अशी कोणतीही दुखापत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला पाहण्यात किंवा आजूबाजूच्या गोष्टी समजून घेण्यात अडचण येत असेल, त्याला कन्कशन असे म्हणतात. क्रीडा जगतात हे अगदी सामान्य आहे. विशेषत: फुटबॉल, रग्बी आणि क्रिकेटसारख्या खेळांमध्ये हा नियम वापरला जातो.
२०१३ मध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूजचा चेंडू लागून मृत्यू झाल्यानंतर या नियमावर गांभीर्याने विचार करण्यात आला आणि अखेर २०१९ मध्ये ICC ने हा नियम लागू केला. १ जुलै २०१९ पासून लागू झालेल्या Concussion Substitute Rule मध्ये ICC ने स्पष्ट केले आहे की, खेळादरम्यान कोणत्याही खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागल्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारे दुखापत झाल्यास, वैद्यकीय पथक ताबडतोब त्याचे परीक्षण करते आणि खेळाडू पुढे खेळू शकतो की नाही हे जाणून घेते. खेळाडूला कोणत्याही प्रकारची चक्कर आल्यास किंवा अंधुक दृष्टी असल्यास किंवा वेदना होत असल्यास, त्याला ताबडतोब मैदानाबाहेर घेऊन जाणे गरजेचे असते. फिजिओ त्या खेळाडूशी संवाद साधतो आणि त्याची तपासणी करतो. जर खेळाडू त्यानंतर फलंदाजी करण्यास तयार असेल पण फिल्डिंग करण्यासाठी फिट नसेल तर त्याला बॅट करून दिली जाते आणि फिल्डिंगमध्ये त्याला पर्यायी खेळाडू आणला जातो. हा ICC चा नियम आहे. या नियमानुसारच दुबेचा पर्यायी खेळाडू म्हणून हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला.