
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एकदा भूकंप होणार अशा चर्चांना उधाण आलं असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केले आहे. दोन शिवसेना झाल्या याचं दु:ख आहे. संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार, आता स्थिती इतकीही लांब नाही जी पुन्हा जोडू शकणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांनी केलेले विधान आगामी राजकीय भूकंपाचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आजही माझ्या यातना होतात. आजही कधी उबाठा गटातील पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतात, त्यांचे आणि आमचे नाते तसेच आहे. परंतु मनात जे अंतर पडलं आहे. तू त्या पक्षात, मी या पक्षात हे आवडत नाही पण त्याला करणार काय..एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचे तार जुळले पाहिजे. संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करायचा प्रयत्न करेन. ज्यांचं तोंड पाहत नव्हता त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात, ती सोडली तर माझ्याकडून १०० चूका झाल्या असतील की नाही, आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रयत्न एकाबाजूने करून चालत नाही. एकमेकांना अपमानित करून एकत्र आलं पाहिजे असं वाटत असेल तर ते आजच्या घडीला शक्य नाही. राज ठाकरे आणि त्यांनी एकत्र यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बॅनर्स लावले, उपोषण केले मात्र तरीही झाले नाही. एका कुटुंबातील व्यक्ती ते एकत्र आले नाहीत आम्ही तर फार दूर लोटले गेलोय. हे काही दिवसांचे सोबती आहेत ते जातील असं त्यांना वाटते. परंतु आज काय अवस्था हे पाहतोय. ताकद वाढवायची असेल तर एकत्र यायला हरकत नाही, पण यात पुढाकार कोण घेईल हे माहिती नाही. जर पुढाकार कुणी घेतला, विचारांची एकवाक्यता आली तर त्यात गैर काय राहणार नाही असंही मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान, दोन पाऊले मागे जाणे हा त्यावर उपाय आहे. आदित्य ठाकरे हे करू शकत नाही. आदित्यला मागचा इतिहास माहिती नाही. संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे होते. जे त्या फळीतले आहेत त्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकते. आजही आम्ही एकमेकांना भेटतो. विचारपूस करतो परंतु मनात भीती असते, कुणी पाहिले, कुणी बोलले तर…हे अंतर वाढत राहिले तर ते कधी जुळणार नाही. आता जोडायची स्थिती नसली तरी इतकंही लांब नाही की ते जोडू शकणार नाहीत असंही सूचक भाष्य संजय शिरसाट यांनी केले आहे.