24 ऑगस्ट च्या महाराष्ट्र बंदला नेमक काय बंद,काय चालू राहणार ?वाचा सविस्तर

0
654

बदलापूर मधील शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडी कडून राज्यात 24 ऑगस्ट शनिवार दिवशी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील मन असलेल्यांनी 24 ऑगस्टच्या महाराष्ट्र बंद मध्ये सह्भागी व्हा असं आवाहन केले आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळण्याचं त्यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे आता 24 ऑगस्टच्या महाराष्ट्र बंद ला कसा प्रतिसाद मिळणार? हे पाहत असताना नागरिकांच्या मनात नेमकं या दिवशी काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार? हा प्रश्न पडला आहे. दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज, बॅंका बंद राहणार का? हे इथे जाणून घ्या.

महाराष्ट्र बंद मध्ये काय बंद राहणार? काय सुरू राहणार?
शाळा – कॉलेज
महाराष्ट्र बंद मध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्याबाबत निर्णय झालेला नाही. सरकार कडून अद्याप त्याबद्दल नोटिफिकेशन जारी केलेलं नाही त्यामुळे शाळा-कॉलेजचा निर्णय अद्याप न झाल्याने त्या नियमित सुरू असतील. ज्या शाळा, कॉलेजला शनिवारी सुट्टी असते त्या आपोआपच बंद असणार आहेत.

बस, रेल्वे, मेट्रो वाहतूक सेवा
24 ऑगस्टची महाराष्ट्र बंद ची हाक ही विरोधकांकडून देण्यात आली आहे. सरकारचा महाराष्ट्र बंद ला पाठिंबा नसल्याने नियमित वाहतूक सेवा सुरू राहणार आहे.

बॅंका 24 ऑगस्ट हा चौथा शनिवार असल्याने बॅंका बंद राहणार आहेत. आरबीआय च्या नियमानुसार, बॅंका दुसरा आणि चौथा शनिवार तसेच प्रत्येक रविवारी बंद असतात.
बदलापूर घटनेमध्ये 17 ऑगस्ट दिवशी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली आहे. आदर्श विद्या मंदिर मधील संतापजनक घटनेवर समाजातून राग व्यक्त होताना काल कोर्टातही न्यायालयाने सरकार व पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. बदलापूर स्थानकामध्ये 17 ऑगस्ट नागरिकांनी आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे दिवसभर रेल्वे यंत्रणा देखील खोळंबून पडली होती.

दरम्यान महाराष्ट्र बंद ला शिवसेना (ठाकरे गट) ,एनसीपी (शरद पवार), कॉंग्रेस यांचा पाठिंबा आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मविआ मधील सारे सहभागी पक्ष 24 ऑगस्ट ला महाराष्ट्र बंद पाळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं, आस्थापनं बंद राहण्याचा अंदाज आहे.