‘24 ऑगस्टचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर आहे,कुणालाही अशाप्रकारे…’ बंदबाबत काय होणार निर्णय?

0
455

 

महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारला आहे. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या बंदमध्ये उतरणार आहेत. बदलापूर येथील दोन चिमूरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे उद्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी बंद राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बंदचा सार्वजनिक सेवांवरही परिणाम होणार असल्याचे सांगितलं जात आहे. असं असतानाच मुंबई हायकोर्टात या बंदबाबतची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणी करण्यात येत असून आज दुपारीच त्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांनी बंदविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. या बंदमुळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये यांच्यासह सर्वसर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. हा बंद बेकायदेशीर आहे, असं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायामूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

बंद बेकायकदेशीर, कारवाई करू

24 ऑगस्टचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कुणालाही अशाप्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नाही. बंद करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल. बंदमध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांवरही कारवाई केली जाणार आहे, असं महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी कोर्टात सरकारच्यावतीने स्पष्ट केलं.

आम्हाला त्यात का खेचता?

याबाबत कायदा स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत तर आमच्या हस्तक्षेपाची गरज काय? जर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे तर यात कोर्टाला का खेचताय?, असा सवाल मुख्य न्यायामूर्तींनी याचिकाकर्त्यांना केला आहे. आज दुपारीच 2:30 वाजता याप्रकरणावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुम्हाला बंद करता येणार नाही

दोन मुलींवर अत्याचार झाला, त्याचं दु:ख आहे. त्यांच्या पालकांना न्याय मिळावा ही भूमिका आहे. पण उद्याचा बंद न्यायासाठी नाही, तर गलिच्छ राजकारणासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी बंद केला होता, त्यांच्यावर कोर्टाने कारवाई केली होती. हे माहीत असतानाही उद्धव ठाकरे बंद पुकारत आहेत. त्याबाबत ट्विट करत आहेत. या बंदमुळे असंघटीत कामगारांचे अतोनात नुकसान होणार आहे. यांची काळजी आहे का तुम्हाला? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तुम्हाला असा बंद करता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here