
माणदेश एक्सप्रेस/सांगली : विज्ञानाच्या शोधामुळे मायाजालच्या जगात वावरत असताना इस्लामपुरात आज सकाळी महिलेच्या दारात करणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बकऱ्याचे मुंडके, पाय दोरीने बांधून दारात अघोरी पूजा करण्यात आली होती. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी सर्व साहित्य पोत्यात भरुन पोलीसांच्या हवाली केले.
इस्लामपूर येथील ऊरुण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचे प्रकार केल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबीयांचे, लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत ते सर्व साहित्य बाजूला करून लोकांच्यात तयार झालेले भीतीचे वातावरण दूर केले.
इस्लामपूर शहरातील उरूण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा, करणीचे साहित्य आढळले. त्यांच्या बकऱ्याचे मुंडके चार पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर लटकवलेले होते. त्यावर लिंबू सुया व टाचण्या टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळया बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या. २१ लिंबू अर्धवट कापलेले त्यावरही टाचण्या टोचलेले समोर ठेवलेले होते. त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची फांजर, मोडलेली फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे, तसेच हळदी, कुंकू, गुलाल त्यावर टाकलेला होता. परिसरात सर्व सामान्य लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरलेले होते.