
माणदेश एक्सप्रेस न्युज
ईश्वरपूर, प्रतिनिधी : “सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असते. कारखाना कोणाच्याही हातात देऊन चालणार नाही. एकदा कारखाना विरोधकांच्या ताब्यात गेल्यानंतर ६० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यावेळी १००० ते १४०० बोगस कामगार भरती करण्यात आले. अनेक कामगारांचे मस्टर नव्हते, तर ऊस न येताही बिले काढण्यात आली. त्यामुळे कारखान्याची झालेली हानी सभासद विसरलेले नाहीत. म्हणूनच पुन्हा एकदा सहकार पॅनलला विजयी करण्यासाठी सर्व सभासदांनी एकजुटीने काम करावे,” असे आवाहन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
“भविष्यातील शेती ही एआय (AI), ड्रिप सिंचन आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि ऑटोमेशन पद्धतीने शेती करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे बुद्रुकच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ नाका येथील वनश्री नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलात आयोजित भव्य सभासद संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडीक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोसले म्हणाले, “सहकारी संस्था उभ्या करण्यासाठी जितके कष्ट लागतात, त्यापेक्षा जास्त कष्ट त्या यशस्वीपणे चालविण्यासाठी लागतात. पेठ, कामेरी आणि ईश्वरपूर परिसरात विकासकामांना अधिक गती देण्यासोबतच नवीन सिंचन योजना राबविण्याचाही आमचा मानस आहे.”
सम्राटबाबा महाडीक म्हणाले, “सहकारी साखर कारखाना सक्षमपणे चालविण्याची क्षमता फक्त डॉ. सुरेश भोसले यांच्यात आहे. कारखाना चुकीच्या हातात जाऊ नये यासाठी महाडिक गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. वाळवा तालुक्यातील महाडिक गटाचे कार्यकर्ते प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचून सहकार पॅनलच्या विजयासाठी काम करतील.”
राहुलदादा महाडीक म्हणाले, “मागील निवडणुकीत सहकार पॅनलला ११ हजार मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी ही आघाडी २० हजारांपर्यंत जाईल, असा मला विश्वास आहे. गावोगावी जाऊन कार्यकर्ते आणि सभासदांशी थेट संवाद साधून सहकार पॅनलला सहकार्य करण्याचे आवाहन केले जाईल. यावेळी वाळवा तालुक्यात विक्रमी मतदान होईल.”
यावेळी वाळवा तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाडीक-भोसले कुटुंबीयांचे दशकांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध
“स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडीक आणि स्वर्गीय जयवंतराव भोसले यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व विश्वासाचे संबंध होते. जयवंतराव भोसले लोकसभा निवडणुकीत उभे राहिल्यापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत महाडीक कुटुंब आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडीक यांचे मला कायम मार्गदर्शन लाभले. त्यांच्याशी असलेले स्नेहबंध आजही कायम असून सम्राट महाडीक आणि राहुल महाडीक हे देखील आमच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.”


