sangali : सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना; खेळताना ओढणीने गळफास लागून ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

0
798

माणदेश एक्सप्रेस/सांगली : वांगी (ता. कडेगाव) येथील पल्लवी नितीन शिंदे (वय ९) या मुलीचा घराच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासात खेळताना गळफास लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिंचणी-वांगी पोलिस तपास करत आहेत.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वांगी (ता. कडेगाव) येथील गावाच्या पश्चिम बाजूस असलेल्या मोकळे मळा येथे नितीन शंकर शिंदे हे आपल्या कुटुंबासह रानातील वस्तीवर राहत आहेत. नितीन यांना ११ वर्षांचा मुलगा व ९ वर्षांची पल्लवी ही मुलगी आहे. पल्लवी बराच वेळ झाला तरी परत आली नाही. त्यामुळे आईने तिचा शोध सुरू केला. तेवढ्यात घरातील लोक आले. सर्वांनी तिची शोधाशोध चालू केली. तेव्हा रात्री उशिरा घराच्या दक्षिण बाजूस असलेल्या आंब्याच्या झुडपास गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत पल्लवी आढळून आली. वडिलांनी तिला तातडीने चिंचणी वांगी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मिरज येथील शासकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

 

 

खेळताना ओढणीने गळफास लागून ती मृत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात व फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीत स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी उपअधीक्षक विपुल पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here