‘दिघे साहेबांच्या काळात ही लोकल ट्रेन नव्हती, त्याऐवजी…’ ‘धर्मवीर 2’च्या टीझरमधील ती चूक नेटकऱ्यांनी हेरली

0
2427

काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मात्र या टीझरमधील एक गोष्ट काहींना खटकली. प्रसाद ओकच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी ही चूक लक्षात आणून दिली. या टीझरमध्ये एक मुस्लिम महिला दिघे साहेबांकडे राखी बांधायला येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात.

महिलांना घेऊन जेव्हा आनंद दीघे निघतात, तेव्हा बाजूने लोकल जाताना दाखवली आहे. ही लोकल दिघे साहेबांच्या काळातली नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘दिघे साहेबांच्या काळात ही लोकल ट्रेन नव्हती जी बॅकग्राऊंडमध्ये दाखवली आहे. त्याऐवजी मालगाडी जाताना दाखवली असती तर बरं झालं असतं. ते व्हिएफएक्सने सहज शक्य होतं. कारण आजकाल बाहेरगावी जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या पण नवीन LHB आहेत, जुन्या ICF नाहीत,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं . ‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे.

‘धर्मवीर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली होती. यामध्ये प्रसाद ओक, क्षितीज दाते, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, अभिजीत खांडकेकर, स्नेहा तरडे, जयवंत आडकर, अंशुमन विचारे यांच्या भूमिका होत्या. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेंनीच ‘धर्मवीर 2’चं लेखन, दिग्दर्शन केलंय. आता या सीक्वेलच्या टीझरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.