राज्यात चाळिशीपार पारा अन् लागल्या घामाच्या धारा; पुन्हा अवकाळीचे ढगही दाटणार

0
104

माणदेश एक्सप्रेस/ पुणे : उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात अकोला येथे ४३.२ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

 

एप्रिल महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट देखील झाली. मध्य भारतापासून दक्षिणेपर्यंत अंतर्गत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तसेच बंगालच्या उपसागरावरून बाष्पीयुक्त वारे येत असल्याने राज्यात पाऊस झाला. काही दिवसातील पावसामुळे असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र आता कमी दाबाचा पट्टा ओसरला आहे आणि उत्तरेकडून उष्ण वारे येत आहेत. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असल्यामुळे राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. किमान तापमानही दोन ते तीन अंशाने वाढले आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्णतेचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला.

 

१० एप्रिलदरम्यान देशातील वातावरण पुन्हा बदल होऊन अवकाळीचे ढग दाटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विजांचा कडकडाट, सोसायट्याचा वारा व वादळी हवामानासह हलका पाऊसही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here