
पुणे | प्रतिनिधी
कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत एका संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात पोलिस तपासात मोठा ट्विस्ट उघड झाला आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेला युवक केवळ कुरिअर बॉय नसून, तरुणीचाच जुना ओळखीचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, पीडितेने या गोष्टीची माहिती तक्रारीतून लपवून ठेवली होती.
अभियंता तरुणीचा ‘मित्र’च निघाला आरोपी
पोलिसांनी शुक्रवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले. तपासात तो मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ असून मागील एक वर्षापासून दोघांमध्ये ओळख आणि संवाद सुरू होता. त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणेही सुरू होते, तसेच समाजाच्या एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
सेल्फी एडिट करून संदेश लिहिल्याचा खुलासा
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ‘मै वापस आउंगा’ असा मेसेज असलेला सेल्फी तिनेच एडिट ॲपच्या माध्यमातून तयार केला होता, अशी कबुलीही तिने पोलिसांना दिली आहे. तथापि, पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला, यावर ती ठाम आहे. त्यामुळे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा कायम ठेवून तपास सुरू ठेवला आहे.
पोलिसांचे तांत्रिक तपासणीत धक्कादायक माहिती
सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी सव्वासात वाजता तरुणीच्या घरात जाताना दिसतो आणि पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडतो. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवून विचारले असता, पीडितेने त्याला ओळखण्यास नकार दिला, हे पोलिसांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. त्याचप्रमाणे, व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल लॉग्स आणि फूड डिलिव्हरी ॲपमधील ऑर्डर डिटेल्स यावरून दोघांमध्ये सातत्याने संपर्क होता, हे स्पष्ट होते.
मुलगी बोलावते, आरोपी गेला – आरोप वेगळे
आरोपी युवकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, तरुणीनेच त्याला घरी बोलावले होते. दोघांमध्ये संभाषणाचे व्हॉट्सॲप मेसेजेस आणि चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे तपासात अनेक नवीन शक्यता उभ्या राहत आहेत.
महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाची पार्श्वभूमी
या प्रकरणानंतर शहरात महिला सुरक्षेवरून चिंता व्यक्त करण्यात आली होती. काही सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. पोलीस प्रशासनाने प्रकरण गांभीर्याने घेत २२ तपास पथकं नेमली होती.
सध्या काय स्थिती?
पोलिस सध्या लैंगिक अत्याचाराचा तपास तांत्रिक पुराव्यांच्या आधारे करत आहेत. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळालेली असून दोघांच्या डिजिटल संवादाचा सखोल अभ्यास सुरू आहे.