थोरल्या बाजीरावांचा भव्य अश्वारूढ पुतळा पुण्यातील युवा शिल्पकाराकडून साकार

0
67

पुणे | प्रतिनिधी
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA), खडकवासला येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ४ जुलै) थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. विशेष म्हणजे हा भव्य पुतळा पुण्यातील युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी साकारलेला आहे. बाजीरावांचा हा पुण्यातील तिसरा अश्वारूढ पुतळा असला तरी, पुढचे दोन पाय हवेत उंचावलेला अश्व आणि भालाफेकाच्या मुद्रेत असलेला बाजीराव यासह साकारलेला हा पहिलाच पुतळा आहे.


‘अजेय’ बाजीराव – शिल्पातून साकारलेला

पुतळ्यातील प्रत्येक तपशीलातून बाजीरावांचा शौर्यदर्शक आवेश, युद्धातील तयारी आणि अजेयपणा स्पष्टपणे दिसून येतो. अश्वाच्या झेप घेण्याच्या क्षणाचा अचूक भास देणाऱ्या या पुतळ्याचे डोके पगडीसह मंदिल, अंगात चिलखत, कमरेला समशेर, तर हातात भालाफेक करणारी मुद्रा — हे सारे अत्यंत जिवंतपणे साकारले आहे.


पुण्याच्या मातीतून साकारलेला अभिमान

या पुतळ्याचे काम संपूर्णतः पुण्यातच पार पडले आहे. मातीपासून सुरुवात करून तब्बल १३ फूट उंच, ४ टन धातूंच्या मिश्रणातून बनवलेल्या या पुतळ्याच्या ओतकामाची प्रक्रिया पुण्यातील कार्यशाळेतच झाली. सतत ६ महिन्यांच्या अथक मेहनतीतून हा पुतळा सिद्ध झाला.


शिल्पकलेचा वारसा घेऊन पुढे चालणारा कलाकार

विपुल खटावकर हे खटावकर घराण्याच्या शिल्पकला परंपरेतील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे आजोबा डी. एस. खटावकर पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार व अभिनव कला महाविद्यालयाचे प्राध्यापक होते. त्यांच्या मुलगा विवेक खटावकर यांच्यानंतर आता विपुलनेही ही परंपरा उत्तमरीत्या जपली आहे.


शिल्पकाराचं व्यक्त झालेलं समाधान

“हे काम मिळालं तेव्हाच त्यातील जबाबदारीची जाणीव झाली. बाजीराव पेशव्यांविषयी सगळं वाचलं, जाणून घेतलं. त्या ‘अजेय’ व्यक्तिमत्त्वाचा आत्मा पुतळ्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुतळ्याला पसंती दिली, तेव्हा हा प्रयत्न सार्थ वाटला.”
विपुल खटावकर, शिल्पकार


पुणे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

थोरल्या बाजीराव पेशव्यांसारख्या अजेय योद्ध्याचा इतिहास जागवणारा पुतळा पुण्याच्या मातीत तयार झाला, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचे क्षण आहेत. NDA सारख्या राष्ट्रीय संस्थेच्या परिसरात या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणं ही पुण्याच्या कला-शौर्य परंपरेला सलाम ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here