संजय राऊत यांची मोदींवर जोरदार टीका

0
68

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– “पवारसाहेबांच्या प्रकृतीची चौकशी शिष्टाचार म्हणून केली जात असेल, तर तो खरा आदरभाव नाही,” अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. परदेशी शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीत मोदींनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी भाजपच्या भूमिकेला ‘ढोंगी शिष्टाचार’ असे संबोधले.

 

पवारांचे पक्ष, घर फोडले आणि आता प्रकृतीची चौकशी?
राऊत म्हणाले, “जर नरेंद्र मोदींना शरद पवारांविषयी खरा आदर असता, तर त्यांनी त्यांच्या पक्षाला फोडले नसते. ज्या परिस्थितीत पवारसाहेबांनी मोदींना मदत केली होती, त्याचे भान ठेवले असते.” त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “हे सर्व शिष्टाचाराच्या नावाखाली ढोंग आहे.”

 

निवडणुकीसाठी तयारी सुरूच
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. निवडणुका कोणासोबत लढायच्या याबाबत पक्षात चर्चा सुरू असून, निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत.”

 

‘आंदोलन ही आमची ओळख’
राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “आंदोलन म्हणजे अराजक नव्हे. विरोधकांनी आंदोलन केलं नाही, तर सत्ता माजेल, आणि लुटेल. शरद पवार व शिवसेना हे आंदोलनातून उभे राहिलेले पक्ष आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाशिवाय अजित पवार उपमुख्यमंत्री झाले नसते,” असे त्यांनी सांगितले.

 

सत्तेचा गैरवापर आणि लुटमार
गेल्या दहा वर्षांत भाजपने सर्वच क्षेत्रात लुटमार केली असून, सत्तेचा उपयोग जनतेसाठी न करता केवळ तिजोरी भरण्यासाठीच केला आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. “सत्ता म्हणजे सेवा नव्हे, ती आता स्वार्थाचे साधन झाली आहे,” अशी जहाल टीका त्यांनी केली.

 

‘ढोंगासाठी नोबेल द्यायचा झाल्यास…’
राऊत यांनी शेवटी असेही म्हटले की, “शिवसेना फोडून, पवारांचे घर फोडून आता अधूनमधून त्या नेत्यांचे गुणगान करणारे मोदी खरे शिवसेनाप्रमुखांचे भक्त नाहीत. खोटेपणा आणि ढोंग जर नोबेल पुरस्कारासाठी पात्र मानले गेले, तर तो पुरस्कार नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्षांना द्यावा लागेल.” राज्याच्या राजकारणात तापलेले वातावरण अधिकच खवळण्याची चिन्हं या वक्तव्यांमुळे दिसत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप-प्रत्यारोप निर्णायक ठरू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here