
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाने विशेष रणनिती तयार केली आहे. महत्त्वाच्या या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाशी मुकाबला करण्यासाठी ठाकरे गटाने मुंबईतील १२ प्रमुख उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारी सोपवली असून, हे नेते आता ‘स्पेशल मिशन’वर मैदानात उतरले आहेत.
राज्यात येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मुंबई महापालिका ही सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे गटासाठी ही निवडणूक ‘अस्तित्वाची लढाई’ मानली जात आहे.
रणनितीचा गाभा:
‘मातोश्री’वर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत उपनेत्यांना विधानसभानिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या नेत्यांना त्यांच्या संबंधित मतदारसंघात जाऊन आढावा बैठका घ्यायच्या असून, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायचा आहे. या मोहिमेतून स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
‘स्पेशल १२’ची जबाबदारी:
- अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे
- उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
- विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
- विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व-पश्चिम
- रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व-पश्चिम
- गुरुनाथ खोत – चांदिवली, कलीना, कुर्ला
- नितीन नांदगावकर – विक्रोळी, भांडुप, मुलुंड
- सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व-पश्चिम, मानखुर्द-शिवाजीनगर
- मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
- अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा
- अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी
- सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी
निवडणूक रणनीतीचा उद्देश:
ठाकरे गटाने लवकरच सर्व २२७ प्रभागांमध्ये जनसंपर्क वाढवून, स्थानिक प्रश्नांवर भर देत महापालिकेतील पकड मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या अभियानातून मुंबईत पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्यातील एकजुटीच्या चर्चांनी जोर पकडला असताना, ठाकरे गटाचे हे विशेष मिशन आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.