
मुंबई– लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक असलेल्या ‘देवमाणूस – मधला अध्याय’च्या नव्या प्रोमोने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता माधव अभ्यंकर (अप्पा) आणि लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील एकत्र थिरकताना दिसत आहेत. मात्र यावेळी चाहत्यांचं लक्ष गौतमीपेक्षा जास्त अप्पांकडेच गेलं आहे, आणि नेटकऱ्यांनीही त्यावर मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ‘देवमाणूस’च्या नव्या पर्वात किरण गायकवाडचा पुनरागमनासह, काही नव्या पात्रांचीही एण्ट्री झाली. मात्र सर्वाधिक चर्चेत आहे ती म्हणजे अप्पांची, म्हणजेच माधव अभ्यंकर यांची झगमगती उपस्थिती. त्यांनी याआधी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अण्णा नाईकची भूमिका गाजवली होती, आणि आजही त्यांना प्रेक्षक ‘अण्णा नाईक’ म्हणूनच ओळखतात.
या नव्या प्रोमोमध्ये गौतमी पाटील आणि अप्पा डान्स करताना दिसत आहेत. मात्र नेटकऱ्यांनी गौतमीच्या तुलनेत माधव अभ्यंकर यांचं परफॉर्मन्स अधिक भावलं. “अण्णा नाईक फुल फॉर्ममध्ये आहेत”, “अण्णा नाईक जोरात, गौतमी पाटील कोमात”, अशा भन्नाट कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काही जणांनी तर शेवंता नावाची जुनी व्यक्तिरेखा आठवत, “आता शेवंता रुसेल का?”, अशी खिल्लीही उडवली.
माधव अभ्यंकर ‘देवमाणूस’मध्ये हिम्मतराव देशमुख म्हणजेच अप्पा हे पात्र साकारत आहेत. हे पात्र थोडं इरसाल, पण मनोरंजक आहे. कुस्तीपटू आणि शेतकरी असलेल्या हिम्मतरावाच्या आयुष्यात दोन बायका – रंजना आणि फुलादेवी – असूनही त्याला नव्या बायकांकडे आकर्षण आहे. त्यामुळेच तो आपली संपत्ती बिनधास्त उधळताना दिसतो, आणि हेच चित्र त्या व्हायरल प्रोमोमध्येही दिसून येत आहे.