रणजी ट्रॉफी सामन्यात कोहली झाला फ्लॉप ! स्टंप्सच्या कोलांटउड्या

0
88

माणदेश एक्सप्रेस/नवी दिल्ली : विराट कोहली दशकभरानंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी उतरला होता. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर हजारो चाहते जमले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या फॉर्माच्या शोधात असणारा कोहली रेल्वेविरुद्धच्या सामन्यात आपली लय शोधेल आणि मोठी खेळी खेळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण विराटच्या पदरी निराशा पडली. रणजी ट्रॉफी सामन्यातही कोहली फ्लॉप झाला आणि त्याचा डाव अवघ्या ६ धावांवर आटोपला. रेल्वेकडून खेळणारा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने त्याला क्लीन बोल्ड केलं.

 

देशांतर्गत क्रिकेटमध्येही विराट कोहलीला निराशेचा सामना करावा लागला आहे. विराट रेल्वेविरुद्ध केवळ १५ चेंडू खेळू शकला, ज्यामध्ये त्याने ६ धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने त्याला क्लीन बोल्ड केलं. विराटने आधी एकेक धावा घेत २ धावा केल्या होत्या. त्यानंतर बाद होण्यापूर्वी विराटने एक शानदार चौकार मारत आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवला पण पुढच्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली प्रत्येक डावात ऑफ-साइड चेंडूवर स्लिपमध्ये बाद होत होता. पण यावेळी विराट बोल्ड झाला.

 

 

हिमांशू सांगवानने चेंडू ओव्हर द विकेटवरून ऑफ स्टंपवर टाकला. आतमध्ये येणारा चेंडू खेळण्यासाठी पुढे आलेला विराटच्या बॅटला न लागता चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून गेला ऑफ स्टंपवर जाऊन आदळला. ऑफ स्टंप कोलांटउड्या घेत हवेत गेला. हिमांशूने मोठ्या जल्लोषात ही विकेट साजरी केली. विराटला बोल्ड झालेलं पाहताच संपूर्ण स्टेडियममध्ये भयाण शांतता पसरली. कोहली बाद झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी स्टेडियम सोडण्यास सुरुवात केली.