
अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकूटाच्या अफलातून कॉमिक टायमिंगने सजलेला ‘हेरा फेरी’ सिनेमाचे दोनही भाग अर्थात ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ चांगलेच गाजले. ‘हेरा फेरी’च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. तर ‘फिर हेरा फेरी’चं दिग्दर्शन नीरज वोरा यांनी केलं होतं. ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन फरहाद सामजी करणार हे जवळपास निश्चित होतं. परंतु चाहत्यांच्या मनातली गोष्ट घडली असून ‘हेरा फेरी ३’च्या दिग्दर्शनाची धुरा प्रियदर्शन सांभाळणार आहेत.
‘हेरा फेरी ३’च्या दिग्दर्शनाची धुरा प्रियदर्शन सांभाळणार आहेत. अक्षय कुमारने काल प्रियदर्शन यांना ६८ व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. त्यावेळी अक्षयने पोस्ट लिहिली की, “हॅपी बर्थडे प्रियन सर! आपण भूत बंगलाच्या सेटवर तुमच्या वाढदिवशी शूटिंग करतोय याहून भारी गोष्ट ती काय. सध्या सेटच्या आजूबाजूला बिनपगारी आणि खरी भूतं वावरत आहेत. माझे मार्गदर्शक बनण्यासाठी धन्यवाद. आयुष्यातील गोंधळाला मास्टरपीस बनवण्यासाठी धन्यवाद. तुमचा आजचा दिवस आणखी काही रिटेक्सने भरलेला असो. येणारं वर्ष तुमच्यासाठी चांगलं जावो!”
पण अक्षय कुमारच्या ‘हेरा फेरी ३’च्या दिग्दर्शनाची धुरा आधी फरहाद सामजी सांभाळणार होते. पण काल सर्वांना सुखद धक्का बसला. जेव्हा अक्षयने दिलेल्या शुभेच्छांची पोस्ट प्रियदर्शन यांनी इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आणि लिहिलं की, “तुझ्या शुभेच्छांसाठी धन्यवाद अक्षय. मी तुला यासाठी एक गिफ्ट देऊ इच्छितो. हेरा फेरी ३ बनवण्याची इच्छा आहे. अक्षय, सुनील आणि परेश रावल तुम्ही तयार आहात का?” आपल्या सर्वांना माहितच आहे की, प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी’च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन केलं होतं.