“हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”… सुनेत्रा पवार यांचे बॅनर झळकले बारामतीत

0
11

 

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. परंतु या निवडणुकीचे पडसाद अजून उमटत आहे. देशात सर्वाधिक लक्षवेधी बारामती लोकसभा मतदार संघातील लढत ठरली होती. पवार कुटुंबातच ही लढत होती. एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे होत्या तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या. या लढतीत सुप्रिया सुळे यांनीच बाजी मारली. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.

त्यानंतर सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले. त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे सर्वत्र सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहे. परंतु पुण्यामध्ये असलेल्या कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे लावलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे. “हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”, असे वाक्य लिहून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यामुळे रिपाइंने कोणावर निशाणा साधला आहे, त्यावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे बॅनर्सवर
पुणे शहरात बॅनरबाजी गाजत असते. भावी खासदार, भावी आमदार असे बॅनर पुण्यात लागले. विधान सभा पोटनिवडणुकीत “आमचेही ठरले धडा शिकवायाचा”, असे बॅनर लागले होते. त्यानंतर भाजप उमेदवार भाजपच्या गडात पराभूत झाले होते. आता पुन्हा कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे लावलेल्या बॅनरची चर्चा शनिवारी रंगली आहे. रिपाइंच्या सचिन खरात गटातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बॅनर लावले आहे. त्यावर “हारकर जितने वाले को बाजीगर कहते है” असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या बॅनर्सवर सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सचिन खरात आणि राजाभाऊ कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो आहे.