
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे घडलेल्या वृद्ध महिलेच्या निर्घृण खून आणि जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत नातीच्या नवऱ्यालाच बेड्या ठोकल्या आहेत. दागिन्यांच्या हव्यासापोटी ८३ वर्षीय वृद्धेला मारहाण करून तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जिवंत पेटवून देणाऱ्या आरोपीच्या अटकेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
आटपाडी पोलीस ठाण्यात मालन जाधव यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मृत महिला मालन मारुती जाधव (वय ८३, रा. शेटफळे, ता. आटपाडी) या ३० जून रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास लघवीसाठी बाहेर जाऊन परत घरात येत असताना हा प्रकार घडला.
घरात एकट्याच राहत असल्याची माहिती असलेल्या आरोपीने त्यांच्या मागोमाग घरात प्रवेश केला. प्रथम त्यांना जोराचा धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर हात पिरगळून छातीत लाथा मारत अमानुष मारहाण केली. वृद्ध महिलेच्या अंगावरील सुमारे १४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३० भार चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. मात्र मालन जाधव यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीने संतापाच्या भरात त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून काडीपेटीने पेटवून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना प्रथम आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र भाजल्याचे प्रमाण अत्यंत गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच ३ जुलै रोजी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
घटना घडल्यानंतर पीडित महिला बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना त्यांचा अधिकृत जबाब नोंदवता आला नाही. त्यामुळे तपास अधिकच कठीण बनला. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हार न मानता तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि कौटुंबिक संबंधांचा बारकाईने अभ्यास केला.
तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की, मालन जाधव यांच्या नातीचा नवरा राजेश दिलीप गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर) याच्यावर संशय आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मालन जाधव या अनेक वर्षांपासून स्वतंत्र राहत होत्या. त्यांच्या नावावर बलवडी आणि शेटफळे परिसरात शेती होती. त्यांनी काही मालमत्ता नातू प्रविण जाधव यांच्या नावावर केल्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांमध्ये नाराजी होती. याशिवाय त्या गावातील लोकांना पैसेही उसने देत असत. त्या घरात एकट्या राहत असल्याची माहिती आरोपीला होती. त्याचाच फायदा घेत त्याने चोरीचा कट रचला. चोरी करताना वृद्ध महिलेने प्रतिकार केल्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना जिवंत पेटवून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत गुन्हा तातडीने उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने अथक प्रयत्न करून आरोपीला जेरबंद केले. आरोपीला पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस निरीक्षक संतोष पवार अधिक तपास करत आहेत.
♦ धक्कादायक गुन्ह्याची उकल
आटपाडीतील वृद्ध महिला खून व जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काही दिवसांत छडा लावत नातीच्या नवऱ्यालाच अटक केली. तपासाच्या वेगवान कामगिरीचे कौतुक होत आहे.
♦ दागिन्यांच्या व जमिनीच्या हव्यासातून हत्या
घरात एकट्या राहणाऱ्या ८३ वर्षीय मालन जाधव यांनी त्यांची जमीन नातवाच्या नावावर केली होती. जमीन नातीच्या नावावर का केली नाही? या उद्देशानेच मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यात आले. व प्रतिकार केल्याने आरोपीने ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून देण्यात आले घटनास्थळावर चर्चा रंगली होती.
♦ सीसीटीव्ही नसतानाही आरोपी जेरबंद
घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही नव्हते आणि पीडितेचा जबाबही नोंदवता आला नव्हता. तरीही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत तपास करत आरोपींना अटक केली.


