
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : प्रेमविवाह करून संसार सुरू केलेल्या दाम्पत्यातील वादाचा शेवट थेट खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना सांगलीतील विश्रामबाग परिसरात उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आनंद हणमंत सर्जे (वय २८, रा. पोळमळा, सांगली) असे मृत पतीचे नाव आहे. आनंद हा सांगली शहरातील एका नामांकित कपड्यांच्या दुकानात विक्रेता म्हणून काम करत होता. तो पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे आनंद याला पत्नी आणि मेहुण्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला झोपेतच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी करताना गळ्यावर ओरखड्यांच्या खुणा आढळल्या. यामुळे संशय बळावल्याने विश्रामबाग पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. पत्नीच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला.
त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तपास अहवालात गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या २३ वर्षीय प्रियकराला ताब्यात घेत चौकशी केली.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पती दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत होता आणि शिवीगाळ करून त्रास देत असल्याचा दावा पत्नीने केला. गुरुवारी पहाटे किरकोळ वाद झाल्यानंतर तिने प्रियकराला घरी बोलावले. दोघांनी मिळून आनंद याचे पाय ओढणीने बांधले आणि छातीवर बसून गळा आवळत त्याचा खून केला.
विश्रामबाग पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे.


