
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड : माण तालुक्यातील मार्डी गावाजवळ तुटून पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून आजी व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. 24) दुपारी घडली. या घटनेमुळे मार्डी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालन विलास काळे (वय 60) व त्यांचा नातू सुजीत युवराज काळे (वय 13, दोघे रा. मार्डी, ता. माण) हे शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी गावालगतच्या बेंदमळा परिसरात गेले होते. यावेळी भिमराव बाळू काळे यांच्या विहिरीजवळील वीज खांबावरील तुटून पडलेल्या विद्युत तारेचा त्यांना जोरदार शॉक लागला. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
युवराज विलास काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ एम. आर. हांगे करीत आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन व पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, तुटलेल्या वीजतारेमुळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने महावितरणच्या देखभाल व सुरक्षिततेच्या उपाय योजनांबाबत ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


