विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच बाप आणि लेक एकमेकांविरुद्ध लढणार

0
312

येत्या विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघात बाप-लेक-पुतण्यामध्ये राजकीय लढाई पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात राजकीय लढत होणार आहे. तर माजी आमदार अंबरीश आत्राम हे महायुतीत तिकीट मिळालं नाही, तर बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

अहेरी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यंदा या मतदारसंघात बाप-लेक-पुतण्यात अशी राजकीय लढत होणार आहे. भाजप नेते आणि माजी आमदार अंबरीश आत्राम हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. नुकतंच अंबरीश आत्राम यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी भाग्यश्री आत्राम आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेच्या तोंडावर बंड करत शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली तेव्हा त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा झाला. आता यावर धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे अंबरीश आत्राम यांनी निशाणा साधला. “हा सर्व धर्मराव आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा गेम आहे. जर दोन्ही पक्षातून कोणीही निवडून आले तर आमदारकी घरीच राहणार हा आत्राम यांचा गेम आहे”, असे अंबरीश आत्राम म्हणाले.

अंबरीश आत्राम निवडणूक लढण्यावर ठाम
गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांचे अहेरी विधानसभा क्षेत्राकडे लक्ष लागले असून सध्या राजकारण तापले आहे. “मी अहेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. याबद्दल तिकीट वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. पण जर मला महायुतीकडून तिकट मिळाले नाही, तर मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढेन. अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्यास मी तयार आहे”, असे अंबरीश आत्राम यांनी म्हटले.

“मी भाजप पक्ष सोडला तरीही भाजप पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबतच असणार आहेत. त्यामुळे मी या विभागातून निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच” असा निर्धार अंबरीश आत्राम यांनी केला आहे. सध्या अहेरी विधानसभेतून तीन आत्राम यांचे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अंबरीश आत्राम हे 2014 ते 2019 या काळात आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या अहेरीत विद्यमान आमदार हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी चर्चा आहे. यामुळे धर्मरावबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम आणि अंबरीश आत्राम यांच्यात लढाई होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here