
माणदेश एक्सप्रेस न्यूज : भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या प्रगतीबाबत आणि आगामी दोन आठवड्यांच्या हवामान अंदाजाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मे महिन्याच्या अखेरीस उत्तर आणि मध्य भारताला होरपळवून काढणारी उष्णतेची लाट आता ओसरली असून नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. ४ जून रोजी मान्सूनने केरळसह कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांत प्रवेश केला आहे.
राज्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी पूर्ण केली असली तरी मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण गोवा तसेच महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
४ ते १० जून या कालावधीत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ११ ते १७ जून या दुसऱ्या आठवड्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असला तरी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पाऊस सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या काळात महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, मान्सूनची प्रगती सुरू असताना देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये ६ ते ८ जून तर पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ७ ते १० जून दरम्यान उष्णतेची लाट जाणवू शकते. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत दमट व उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पहिल्या आठवड्यात ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागांत गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून खरीप हंगामाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

