अर्थमंत्री निर्मला सीतारामन नोकऱ्यांसदर्भात तीन योजना; पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना 15 हजारांचा प्रोत्साहनपर भत्ता

0
335

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सातव्यांदा एनडीए सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडत आहेत. काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केली. या अर्थसंकल्पात (Budget 2024) देशातील रोजगार वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याशिवाय, महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala Sitharaman) यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी तीन नव्या योजनांबाबत संसदेत माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.

हा प्रोत्सहन भत्ता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी होणाऱ्या नोंदणीच्याआधारे दिला जाणार आहे. पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना आणि ज्या कंपनीत ते काम करतात त्यांना या योजनांमुळे फायदा होणार आहे. या तीन योजनांपैकी पहिल्या म्हणजे स्कीम ए मध्ये संघटित क्षेत्रात पहिल्यांदा कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. या नोकरदारांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत थेट पैसे जमा होणार आहेत. नव्या नोकरदारांना या योजनेतून 15 हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. विशेष म्हणजे महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेमुळे 2 कोटी 10 लाख तरुणांना फायदा होईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम बी योजना

उत्पादन क्षेत्रातील रोजगार वाढवण्यावर स्कीम बी योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पहिल्यांदा नोकरीला लागणारे तरुण आणि त्यांची कंपनी या दोघांनाही भविष्य निर्वाह निधीत जमा करणाऱ्या रक्कमेच्या हिशेबाने इन्सेन्टिव्ह देण्यात येईल. पहिले चार वर्ष संबंधित नोकरदार आणि संबंधित कंपनीला हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल.

स्कीम सी रोजगार आणि कौशल्य विकास

नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम सी अंतर्गत सर्व क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. एखादा तरुण पहिल्यांदा नोकरीला लागल्यानंतर त्याची कंपनी भविष्य निर्वाह निधीसाठी किती पैसे जमा करते, याआधारे संबंधित नोकरदाराला दोन वर्षे महिन्याला 3000 रुपयांपर्यंतची रक्कम परत केली जाईल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here