
माणदेश एक्सप्रेस न्युज
जत : विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करताना सर्व विषयांचा सखोल अभ्यास करावा व मुलाखतीस सामोरे जाताना आत्मविश्वास बाळगावा असे आवाहन डॉ. दत्तात्रय थोरबोले यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथे इंग्रजी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित मुलाखतीला सामोरे जाताना या विषयावरील परिसंवादामध्ये प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. थोरबोले म्हणाले की, ज्या तळमळीने विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करतात, त्याच पद्धतीने मुलाखतीची तयारी केली पाहिजे. आपले व्यक्तिमत्व व ज्ञानाची तपासणी करण्यासाठी मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्व खुलते व आपली आकर्षक देहबोली व संवाद यामुळे आपण पदासाठी पात्र होतो. त्यामुळे मुलाखतीची तयारी करताना विद्यार्थ्यांनी खबरदारी बाळगावी, असेही ते यावेळी म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.शिवाजी कुलाळ म्हणाले, मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी, आत्मविश्वास व योग्य संवाद कौशल्य यावर भर द्यावा. नोकरी देणाऱ्या विषयी अधिक अभ्यास करावा. आपले परिचयपत्र अद्ययावत ठेवावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मुलाखत दिल्यास यश निश्चित मिळेल.
या परिसंवादाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.लक्ष्मण भरगंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.तुकाराम सन्नके यांनी तर आभार प्रा.देवयानी करे यांनी व्यक्त केले. या परिसंवादास मराठी विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे, प्रा.सदाशिव माळी, इंग्रजी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.