
अॅबटली कुमार दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ हा चित्रपट २५ डिसेंबर २०२४ मध्ये सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन,किर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि जॅकी श्रॉफ,राजपाल यादव यांसारख्या तगड्या कलाकारांची फळी चित्रपटात पाहायला मिळाली. परंतु ‘बेबी जॉन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. अॅक्शन, रोमान्स आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली. बेबी जॉनच्या अपयशानंतर आता अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जॅकी श्रॉफ यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. अलिकडेच राजपाल यादवने देखील एका मुलाखतीमध्ये ‘बेबी जॉन’च्या अपयशावर भाष्य केलं होतं. आता त्यानंतर जॅकी श्रॉफ व्यक्त झाले आहेत. दरम्यान, या मुलाखतीमध्ये जॅकी श्रॉफ म्हणाले, “या सगळ्याचा निर्मात्यांवर परिणाम होतो. त्यांनी या प्रोजेक्ट्साठी विश्वास ठेवून खूप पैसे लावलेले असतात. जर ही रक्कम रिकव्हर झाली नाही तर एक अभिनेता म्हणून फार वाईट वाटतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपला परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा शिवाय चित्रपटाने देखील चांगली कमाई करावी असं आपल्याला वाटत असतं.”
दरम्यान, ‘बेबी जॉन’ हा चित्रपट जवळपास १८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला. परंतु चित्रपटाने जगभरात ६०. ४ कोटी रुपये इतकी कमाई केली. तर भारतात फक्त ३९.३४ कोटी इतकं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं.