नवजात शिशू चोरी प्रकरणी आरोपी महिलेस अटक

0
286

बाळ नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याच्या आईकडे सुपूर्द

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील प्रसूतिपश्चात कक्ष क्रमांक 64 येथून दिनांक 3 मे 2025 रोजी दुपारी 12 च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान अलदार या महिलेचे 3 दिवसांचे पुरुष जातीचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली होती. दिनांक 5 मे रोजी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करुन तिच्याकडून चोरी गेलेले बाळ ताब्यात घेऊन त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

 

 

बाळ गहाळ झाल्याची बाब कर्तव्यावर उपस्थित परिचारिका यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने महात्मा गांधी चौक, पोलिस स्टेशन, मिरज येथे तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने घटनास्थळी तपासणी करुन संबंधितांचे जाब-जबाब घेऊन तसेच रुग्णालयातील सी.सी.टी.व्ही. फुटेज यांची तपासणी करुन तातडीने पुढील तपास सुरू केला.

 

 

 

संशयित सारा सायबा साठे (वय २४) ही मूळची इचलकरंजी येथील रहिवासी असून ती व पती सायबा साठे हे दोघे सावळज येथे वास्तव्यास आहेत. दोघांचा प्रेमविवाह असून काही महिन्यापुर्वीच संशयित महिलेचा गर्भपात झाला होता. त्यावेळी उपचारासाठी मिरजेतील रूग्णालयात दाखल होती. यामुळे रूग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची तिला माहिती होती.

 

 

 

मातृत्व हरवलेल्या तरूणीने अर्भक चोरीचे कृत्य केले. शनिवारपासून सलग ५० तासाहून अधिक काळ अर्भक तिच्या ताब्यात होते. मातेच्या दुधापासून वंचित असलेल्या बाळासाठी तिने दुधभुकटीचा वापर केला. पोलीसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अप्पर अधिक्षक रितू खोकर यांनी बाळाला आईच्या ताब्यात दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here