पावसाळ्यात आदित्य ठाकरेंना अटक होणार? नितेश राणेंच्या वक्तव्याने खळबळ

0
77

माणदेश एक्सप्रेस न्यूज| मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरु असतानाच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. “उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणजेच आदित्य ठाकरे पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो,” असा थेट इशारा राणेंनी दिला.

 

धाराशिव दौऱ्यावर असताना नितेश राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी डिनो मोरिया प्रकरणाचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले. “मुंबई नालेसफाई घोटाळ्यात डिनो मोरियावर ईडीची चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही अडचण वाढू शकते,” असा दावा करत राणेंनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं.
त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरही राणेंनी उपरोधिक टीका केली. “एकाकडे २० आमदार, तर दुसऱ्याकडे शून्य… आणि आम्हाला त्यांची भीती वाटते म्हणे! एवढ्या शक्तीने आम्हाला घाम फुटतोय का?” असा सवाल करत त्यांनी युतीची खिल्ली उडवली.

 

राणेंनी असेही म्हटले की, “डिनो मोरियासारख्या प्रकरणांवरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच ही युतीची चर्चा आहे.” तसेच, “हिंदुत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड कोसळला,” असा टोलाही त्यांनी लगावला. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध ठाकरे गटात पुन्हा एकदा तीव्र शाब्दिक चकमक होण्याची शक्यता आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here