“मी राजीनामा का द्यावा?कारण काय? धनंजय मुंडे

0
550

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली . या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. तसेच पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी कराड हा सीआयडीला शरण आला. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत.

तसेच वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत. यावरून धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा , अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधकांच्या टिकेला आता धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी राजीनामा द्यावा तर का द्यावा? कुठल्याही घटनेत माझा काहीही संबंध नाही”, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं आहे. यासंदर्भात मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “मी राजीनामा द्यावा तर का द्यावा? याचं काहीतरी कारण तर लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे, ना माझा कुठला संबंध आहे.उगाचाच कोणाचातरी राजीनामा मागायचा?”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

बीडच्या प्रकरणाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला. “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो”, असं विधान आज वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या या विधानावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, “विजय वडेट्टीवार हे बोलायला हुशार आहेत. मात्र, अशा पद्धतीने लहान आका आणि मोठा आका अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकतोय. कोणाचा एन्काऊंटर आणि कोणाचं काय? एक तर बीडच्या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ज्यांनी ही हत्या केली त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

तुम्ही मंत्री राहिलात तर बीडच्या प्रकरणातील तपासावर दबाव येऊ शकतो, असा आरोप विरोधकांचा आहे. त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून काढलं जावं, अशी विरोधकांची मागणी आहे. यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, “त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला आहे. या प्रकरणाचा न्यायालयीन तपास देखील होणार आहे. त्यामुळे या तपासावर कोणताही प्रभाव मी मंत्री राहिल्यानंतर होऊ शकत नाही”, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं.

धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “आता मीच मंत्री, मीच पालकमंत्री का नसावं? हे विरोध करणाऱ्या लोकांना विचारलं तर अधिक योग्य होईल”, असं त्यांनी म्हटलं.

बीडमध्ये सर्वपक्षीय आमदार एकवटतात याचं कारण काय? असं विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले, “सर्वपक्षीय आमदारांनी एकवटणं हे हत्येच्या घटनेबाबत आहे. त्यामुळे ते एकवटले हे चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही. कारण ती घटना अतिशय दुर्देवी आहे. त्या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांना फाशी व्हावी अशीच सर्वांची भूमिका आहे”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.