माणदेश एक्सप्रेस न्यूज : खानापूर/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती आता बदलायला लागली आहे. तुम्ही हिमतीने पुढे या विकास करायचा असेल तर आपला हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत असायला हवा. तुमचा मावळा लढायला लागला आहे. तुम्ही आतापर्यंत अनेकांना अनेक वेळा निवडून दिले आता आम्हाला एकवेळ संधी द्या. तुमच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करून जनतेच्या आशीर्वादानेच विधानसभेत जाणार असल्याचा विश्वास आमदार गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला.
खानापूर मतदार संघातील व तासगाव तालुक्यातील पेड येथे ग्रामीण रुग्णालय विशेष बाब म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा पेड, मोराळे, किल्लापुर, नर्सिहपूर, निंबगाव, विजननगर,कापूरगाव येथील नागरिकांनी आयोजित केला होता. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.
यावेळी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, सूंदर पाटील, ज्येष्ठ नेते दत्तू आबा शेंडगे, ज्येष्ठ नेते विलास भाऊ पाटील, जिल्हा सचिव पंकज दबडे, संभाजी आण्णा खराडे, कोंडी पाटील, आनंद पाटील, संदीप सूर्यवंशी, पंढरीनाथ कणसे, राजु पाटील, जयगोंडा पाटील, जालिंदर शेंडगे, सुंदर पाटील, स्वप्निल पाटील, स्वप्निल शेंडगे, निलेश पाटील इतर ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, पेड येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे हा कोर्टाचा निर्णय असताना गेली अनेक वर्ष ग्रामीण रुग्णालय होऊ शकले नाही. हे येथील आतापर्यंत च्या आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे. गावातील नागरिक माझ्याकडे येत सगळा असणारा प्रकार सांगितला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला. यावेळी विशेष बाब म्हणून शासनाकडून ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. खरे तर पेड येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर होण्यास फार अडचणी होत्या. लोकसंख्या, अंतराची अट अशा अनेक गोष्टीची अडचण असतानाही मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी माझ्या मागणीचा विचार करून 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे.
राजकारण करत असताना सत्ता आपल्या हातात असायला हवे तरच आपले काम नीट आणि पुढे नेता येते.विसापूर सर्कल मधील नागरिकांनी कोणतेही काम घेऊन या तुमचे काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आमची आहे. टेंभू योजनेचा अनेक जमिनीवर असणारा स्लॅब उठवण्यात यश आले आहे. अनेक गावात काही त्रुटी आहेत. त्यावर ही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, की पेड येथील नागरिकांनी नेहमी आम्हाला साथ दिली आहे. ग्रामीण रुग्णालय मंजूर करून उत्तरदायित्व होण्याची संधी आम्हाला मिळाली. आम्ही नेहमीच पेड च्या जनतेच्या सोबत आहोत. पेड सह आसपासच्या गावातील नागरिकांनी आमच्या सोबत रहावे आम्ही आपणास कधीच निराश करणार नाही असा विश्वास दिला.
यावेळी अनिल पाटील म्हणाले की, विसापूर सर्कल मधील नागरिकांनी एखादा पडळकर बंधूंना साथ द्या, मगच तुम्हाला खरे पडळकर बंधू कळतील. तसेच, ब्रम्हानंद पडळकर यांना विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी उपस्थित नागरिकांना केली. यावेळी वैशाली शेंडगे, सूरेश शेंडगे, विलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.