
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : खानापूर -आटपाडी मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवत विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रवेश मंगळवारी (दि. १० जून) मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडणार असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून वैभव पाटील हे पक्षातील अंतर्गत घडामोडींमुळे नाराज असल्याची चर्चा होती. जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने डावलले जात असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. त्यानंतर शनिवारी सायंकाळी विट्यातील आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पाटील गटाच्या पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी वैभव पाटील यांना सर्वाधिकार देण्याचा ठराव करण्यात आला.
या निर्णयानंतर वैभव पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला. त्यामुळे विटा आणि खानापूर आटपाडी मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. वैभव पाटील यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर भाजपला मजबूत बळ मिळणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
या निमित्ताने बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “वैभव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश हा विकासाभिमुख नेतृत्वाला दिलेला पाठिंबा आहे. त्यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाच्या सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल.”
कार्यक्रमासाठी वैभव पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार असून, त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत भाजपच्या वतीने मोठ्या उत्साहात होणार आहे.