शासकीय कामात अडथळा; ग्रामसेवकास शिवीगाळ व धक्काबुक्की :पळसखेल येथील चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

0
403

माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी : पळसखेल (ता. आटपाडी) येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळ दूषित पाणी बाहेर काढण्याचे शासकीय काम सुरू असताना चार आरोपींनी जेसीबीसमोर येऊन काम बंद पाडत ग्रामसेवकास शिवीगाळ व धक्काबुक्की केली. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नंदकुमार निवृत्ती भोसले (वय ५७), ग्रामसेवक, पळसखेल, हे पळसखेल येथे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ दूषित पाणी काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने चर काढण्याचे काम करत होते. त्यांच्यासोबत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

 

 

याचवेळी शालन विलास सावत, विलास तातोबा सावत, समाधान विलास सावत आणि सुनिता राजेंद्र सावत (सर्व रा. पळसखेल) या चौघांनी घटनास्थळी येत थेट जेसीबीसमोर उभे राहत काम बंद पाडले. त्यानंतर त्यांनी ग्रामसेवक भोसले यांना ढकलून देत शिवीगाळ करत धमक्या दिल्या. शासकीय कामकाजात विघ्न निर्माण केल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

ही घटना ९ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. याप्रकरणी ग्रामसेवक भोसले यांच्या फिर्यादीवरून आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत. या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here