प्रवासी बॅगेवरुन शिराळ्यातील खूनाचे गूढ उकलले ; खून प्रकरणी तिघांना अटक

0
15
फोटो : सांगली : पलूस येथील राजेश जाधव खून प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी, समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व तपास करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग
फोटो : सांगली : पलूस येथील राजेश जाधव खून प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी, समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व तपास करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : शिराळ्यात आढळलेल्या बेवारस खूनाचे गूढ उकलण्यात सांगली पोलीसांना यश आले आहे. प्रवासी बॅगेवरून पोलिसांनी तपास करत या खूनप्रकरणी मृताच्या पत्नी, मुलगीसह तिघांना पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली.

खून झालेली व्यक्ती राजेश वसंतराव जाधव (वय ५३) रा.पलूस असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्याचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून खून करून प्रेत प्रवासी बॅगेत ठेवून शिराळ्यात पूलाखाली टाकण्यात आले होते. या प्रकरणी मृताची पत्नी शोभा जाधव, मुलगी साक्षी जाधव (रा. पलूस) आणि नातेवाईक देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे (वय २४ रा. शेवाळेवाडी, कराड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मृत जाधव हा कोणताही कामधंदा न करता दारू पिउन पत्नीवर संशय घेउन मारहाण करत होता. यामुळे या तिघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचे अधिक्षक घुगे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, शिराळ्यातील बाह्यवळण रस्त्यावरील पूलाखाली दि. २० मे रोजी दुर्गंधी सुटल्याने पाहणी केली असता सतरंजीत गुंडाळलेले सडलेली मानवी प्रेत प्रवासी बॅगमध्ये आढळले होते. प्रेत पूर्णपणे कुजलेले असल्याने स्त्री की पुरूष याचीही ओळख करता येत नव्हती. केवळ प्रेत ठेवलेल्या प्रवासी बॅगेवरून पोलीसांनी संशयितांचा माग काढला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी प्रवासी बॅग तयार करणार्याठकडे चौकशी केली. यावेळी पलूसमध्ये अशी बॅग दिल्याचे समजल्यानंतर बॅग विक्रेत्याकडे चौकशी केली असता शेवाळे यांने बॅग नेल्याचे समजले. यावरून चौकशी केली असता पोलीसांना या खूनाचा छडा लावण्यात यश आले.

त्यानंतर पोलिसांनी जाधव यांचे नातेवाईक देव्या शेवाळे, साक्षी जाधव, शोभा जाधव यांच्याकडे राजेश यांच्याबाबत चौकशी केली. त्यांच्या जबाबात विसंगती दिसून आली. त्यामुळे तिघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत राजेश व्यसनाधीन होता. त्यातून तो पत्नी शोभाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याला कंटाळून या तिघांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा खून करून तो सुटकेसमधून घालून ती सुटकेस शिराळा येथे टाकून दिली होती अशी कबुली दिली. त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, (Sangli Superintendent of Police Sandeep Ghuge) ,अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर, (Sangli Additional Superintendent of Police Ritu Khokar) इस्लामपूरचे उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शिराळ्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, प्रवीण साळुंखे, युवराज सरनोबत, अनिता मेनकर, सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, कालीदास गावडे, शशिकांत शिंदे, नितीन यादव, शरद जाधव, शरद बावडेकर, अमर जाधव, सचिन धोतरे, संदीप पाटील, उदय माळी, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here