
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : तालुक्यातील नेहरूनगर येथे दोन ठिकाणी अवैधरित्या दारूची विक्री होत आहे. त्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. ही दारू विक्री बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार रोहित पाटील यांना देण्यात आले आहे. पोलिसांना या दारू विक्रीबाबत कळवूनही ते कारवाई करीत नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
आमदार रोहित पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपण तासगाव येथे घेतलेल्या आमसभेत तालुक्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करू, असा निर्णय घेतला आहे. मात्र नेहरूनगर येथे दोन ठिकाणी खुलेआमपणे अवैधरित्या दारूची विक्री केली जात आहे. याबाबत संबंधितांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतकडेही तक्रार केली आहे. शिवाय पोलिसांनाही याबाबत कळवले आहे. मात्र कसलीही कारवाई झाली नाही.
या दारू विक्रीमुळे गावातील अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत. तरुण पिढी बरबाद होत असताना पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दिवसाढवळ्या ही दारू विक्री होत असताना पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. संबंधितांनी दारू ढोसण्यासाठी बेवड्यांना आडोसा करून दिला आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी या ठिकाणी अनेक बेवड्यांनी गर्दी केलेली असते.
दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. दारू ढोसून अनेकजण घरी जाऊन भांडण – तंटा करीत असतात. शिवाय यातून गुन्हेगारीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी ही दारू विक्री तात्काळ बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर अमित देवकुळे, धनंजय सदामते, रेखा साठे, शितल देवकुळे, सारिका कांबळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.