धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या पाणी कालव्यांमधून दररोज 40 लाख लिटर पाण्याचा अपव्यय

0
141

 

पुणे महानगरपालिकेच्या कालव्यांमधून दररोज 40 लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत, असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पुढचे काही काळ असाच प्रकार सुरु राहिल्यास, पुण्यात मोठे जलसंकट (Pune Water Crisis) लवकरच निर्माण होऊ शकते. परिणामी ऐन पावसाळ्यात झालेल्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार उन्हाळ्यापूर्वीच निर्माण होऊ शकते. पुणे-ओकायामा फ्रेंडशिप गार्डन म्हणजेच पु. ल. देशपांडे उद्यानाच्या (PL Deshpande Garden) मागे असलेल्या अतिक्रमणामुळे या गळतीचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक सांगतात. तसेच, गळतीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

अतिक्रमण पाणीगळतीस कारण
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अतिक्रमणात कालव्यावरील मातीचा भराव आहे, ज्यामुळे संरचनेवर दबाव टाकल्यामुळे पाणी गळती झाली आहे. खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणारा कालवा अनुक्रमे 2500 मिमी आणि 3000 मिमी व्यासाच्या दोन वाहिन्यांद्वारे दररोज 1100 दशलक्ष लिटर पाणी काढतो. साधारण 2.5 मीटर उंचीवर असलेल्या मातीच्या भरावामुळे बागेच्या मागे जमीन तयार झाली आहे, ज्यामुळे कालवा फुटण्याचा धोका वाढला आहे.

नागरिकांना चिंता
कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. त्यानंतर प्रशासनाने कालवा परिसरतातील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला स्थानिकांकडून मोठा विरोध झाला. पीएमसीने जेसीबी मशिनच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू केले. मात्र विरोधामुळे कारवाई थांबवावी लागली. पीएमसी अधिकाऱ्यांनी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी माती काढून टाकण्याच्या निकडीवर भर दिला, परंतु शांततेने या समस्येचे निराकरण करण्यासाठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनी प्रशासनाला अवाहन केले आहे की, अतिक्रमण केलेल्या नागरिकांना संभाव्य धोक्याची जाणीव करुन द्यावी. त्यानंतर त्यांना महत्त्व पटवून दिल्यावर कारवाई करावी. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हे अतिक्रमण हटवावे. अन्यथा पुणे शहरास भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

पीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या एका अधिकाऱ्याने सुरू असलेल्या गळतीबद्दल चिंता व्यक्त करताना सांगितले की, “पाणी कालव्यावरील अतिक्रमणामुळे गळती सुरू झाली आहे, त्यामुळे दररोज 40 लाख लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्यात यावे. यासाठी प्रयत्न सुरु आहेत.” सध्याच्या परिस्थितीमुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांना गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि पुढील अपव्यय आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जलद पावले उचलणे आवश्यक आहे. केवळ कालवाच नव्हे तर पुणे शहराचा समतोलच अतिक्रमणामुळे बिघडला आहे. त्याची प्रचिती नुकतीच झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहर तुंबल्याने आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here