
सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आमदार Jyant Patil जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkr यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावरील एका स्टेटसमुळे हा वाद चिघळल्याची माहिती समोर येत आहे.
जयंत पाटील यांचे समर्थक महेश कुपाडे आणि अमृता कुपाडे यांनी गंभीर आरोप करत, गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या ट्रॅव्हल्स बुकिंग कार्यालयाची तोडफोड केल्याचा दावा केला आहे. कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली असून, संपूर्ण घटना कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे त्यांनी सांगितले.
महेश कुपाडे यांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर ठेवलेल्या एका स्टेटसबाबत काही कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि पुढे हा वाद हाणामारी व तोडफोडीपर्यंत पोहोचला. संतप्त झालेल्या काही जणांनी ट्रॅव्हल्स कार्यालयावर हल्ला करत काचेचे साहित्य आणि इतर वस्तूंची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचबरोबर कुपाडे यांच्या घरावर आणि वाहनावर दारूच्या बाटल्या फेकून नुकसान करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर विटा शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


