
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महापालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधी (भारतीय प्रशासकीय सेवा) यांची नियुक्ती झाली आहे. सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूच्या प्रकल्प अधिकारी पदावरून त्यांची सांगली महापालिकेकडे बदली झाली आहे. नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे निर्देश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिले आहेत.
शुभम गुप्ता यांची बदली 25 मार्च रोजी झाली. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे दिला होता. आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले होते. आयुक्त पदासाठी काही नावे चर्चेत होती. अखेर सत्यम गांधी या तरुण आयएएस अधिकार्या ची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
सत्यम गांधी हे 2021 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील दिघरा हे त्यांचे मूळ गाव. वडील सरकारी सेवेत, तर आई गृहिणी. ते शाळेला सायकलवरून रोज पाच किलोमीटर जात होते. दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत ते टॉपर होते. त्यांनी 2020 मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीच्या डॉ. दयालसिंह कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केली. बारावीनंतरच त्यांनी भारतीय प्रशासन सेवेत जायचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. ते पदवीनंतर पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. अखिल भारतीय स्तरावर त्यांचा दहावा क्रमांक आला आणि ते आयएएस झाले.