
माणदेश एक्सप्रेस/सांगली : फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच घेत असताना अटक करण्यात आलेल्या पलूस पोलीस ठाण्याच्या फौजदाराला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला. लाचलुचपत विभागाने बुधवारी रात्री फौजदार महेश गायकवाड याला पोलीस ठाण्यातच दोन लाखांची लाच घेत असताना सापळा रचून अटक केली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदाराविरोधात पलूस पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावून उपनिरीक्षक (फौजदार) गायकवाड यांनी अटक करण्याची भीती घातली. ती टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन घेण्याची संधी देतो, मात्र, यासाठी दहा लाख रुपये दे, अशी मागणी केली होती. यांपैकी दोन लाख रुपये दिल्यानंतर तक्रारदारास अटक न करता पाठविण्यात आले. दरम्यान, उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर झाला. लाचखोर फौजदार गायकवाड याने तक्रारदारास पोलीस ठाण्यात बोलावून उर्वरित ८ लाख रुपयांची मागणी करत न दिल्यास फोरेक्स ट्रेडिंग अनुषंगाने चौकशी सुरू असून, यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल करेन अशी धमकीही दिली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
गायकवाड विरोधात काल रात्री उशिरा पलूस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले.