रोहित शर्माने घडवला इतिहास! एकाच शतकी खेळीत विक्रमांची लावली रांग

0
379

रोहित शर्माच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाचा ४ विकेट्सने पराभव केला, या पराभवासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका २-० अशा अभेद्य आघाडीसह आपल्या नावे केली आहे. रोहित शर्माला मोठ्या प्रतिक्षेनंतर सूर गवसला आणि त्याने चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह आपले ३२वे वनडे शतक झळकावले. रोहितने ९० चेंडूत १३२ च्या स्ट्राईक रेटने ७ षटकार आणि १२ चौकारांसह ११९ धावांची विक्रमी खेळी खेळली. या खेळीने रोहितने केवळ भारतीय संघाला विजयापर्यंत नेले नाही तर अनेक दिग्गजांनाही मागे सोडले. या एका शतकात त्याने अनेक विक्रम मोडीत काढत इतिहास रचला.

 

 

रोहित शर्माचा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ५० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावत मोठी कामगिरी केली आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून ५०व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ११९ धावांची सर्वात मोठी खेळी करत पहिले स्थान पटकावले आहे.

 

 

 

कटक वनडेमध्ये रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३२वे शतक झळकावले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४९वे शतक ठरले. यासह त्याने सचिनचा विक्रम मोडला आहे. खरंतर, रोहित वयाच्या ३० वर्षांनंतर सर्वाधिक शतकं झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. याआधी सचिनच्या नावावर ३५ शतकांचा विक्रम होता. आता भारतीय कर्णधाराने ३६ शतकं ठोकली असून या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि मॅथ्यू हेडन यांची बरोबरी केली आहे. भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने सचिनला मागे टाकले आहे. सलामीवीर रोहितने ३६८ डावात १५४०४ धावा केल्या आहेत, तर सचिनने १५३३५ धावा केल्या आहेत.

 

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत त्याने राहुल द्रविडला मागे टाकलं. द्रविडने आपल्या कारकिर्दीत ४८शतकं झळकावली होती. जर आपण सक्रिय खेळाडूंबद्दल बोललो तर आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने ५२६ डावांमध्ये ४९ शतकं ठोकली आहेत, तर स्मिथने ४१० डावांमध्ये ४८ शतकं केली आहेत. तर विराट कोहली ८१ शतकांसह पहिल्या तर जो रुट ५२ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

 

 

रोहितने आपल्या शतकी खेळीत ७ षटकार लगावले. यासह आता वनडेत ३३८ षटकार रोहितच्या नावे नोंदवले आहेत. यासह त्याने गेलचा षटकारांचा विक्रम मोडला आहे. आता तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहितने २५९ डावात ही कामगिरी केली आहे. मात्र, या बाबतीत पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी सध्या पहिल्या स्थानावर आहे. त्याने ३६९ डावात ३५१ षटकार लगावले आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here